वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी; परिवहन मंडळाकडून ५००० एसटीचे नियोजन

0

पंढरपूर – पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून गावातूनच मिळणार एसटीची सोय करण्‍यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार हजार ७०० एसटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यंदाच्या आषाढी वारीसाठी अंदाजे १५ लाख भाविक येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. वारीच्या निमित्ताने पंढरीत १५ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय ड्रोनद्वारे देखील गर्दीवर नियंत्रणाचे नियोजन आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून पंढरीत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाते. यंदाही त्याचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

एकाच गावातून किंवा परिसरातून ४० वारकरी येणार असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या गावातूनच एसटी उपलब्ध होईल. तसेच वारकऱ्यांना परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरून एसटीची ऑनलाइन बुकिंग देखील करता येणार आहे. राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांसाठी पंढरपुरात चार बसस्थानके असतील.

वारीच्या काळात स्थानिक वाहतुकीवर परिणाम होणार आहे, पण वारीनंतर लगेचच त्या मार्गांवर पूर्वीप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वारी काळात बंद पडणाऱ्या वाहनांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके देखील नेमली जाणार असून त्याचे नियोजन महामंडळाकडून सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.