जळगाव शहरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्यात चार वर्षीय बालक ठार
जळगाव । जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून याच दरम्यान अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे अक्षरशः लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला. अरविंद सचिन गायकवाड (४ वर्षे, रा.नागेश्वर कॉलनी) असं मयत बालकाचे नाव असून ही धक्कादायक घटना रविवारी (१ जून) संध्याकाळी सहा वाजता नागेश्वर कॉलनीत घडली. अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला,
मजुरी काम करणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद हा रविवारी संध्याकाळी अंगणात खेळत होता. त्यावेळी कुत्र्याने हल्ला करत बालकाच्या डाव्या बाजूला कपाळापासून ते हनुवटीपर्यंत खोलवर जखमा केल्या. यात त्याचा डोळा, गाल फाटला. मानेवर व गळ्यावर जोरदार चावा घेतल्याने खोल जखमा झाल्या. जागोजागी लचके तोडल्याने बालक रक्तबंबाळ झाले.
ही घटना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी धाव घेत किंचाळत असलेल्या बालकाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. जखमी बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले.
नागेश्वर कॉलनी परिसरात या बालकावर हल्ला करण्यापूर्वी या कुत्र्याने कामावरून परतणाऱ्या एका महिलेला चावा घेतला, तसेच इतर तीन ते चार मुलांनाही चावा घेत जखमी केले. सम्राट कॉलनी परिसरातही कामावरून घरी परतणान्या मोहीन बेग अल्ताफ बेग (१९, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाच्या हातालाही मोकाट कुत्र्याने चावा घेतला.
मनपा अधिकाऱ्यांचा मोबाईल बंद, आमदार रुग्णालयात
बालकाच्या मृत्यूच्या घटनेस महापालिकेचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप करीत मनपा अधिकाऱ्यांना येथे बोलवा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर आमदार सुरेश भोळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोहोचले. यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेरून कुत्र्यांच्या त्रासाविषयी माहिती दिली. यावेळी महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली, मनपा आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांशी आमदार भोळे यांनी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी रोष व्यक्त केला व अमावाची समजूत काढून उपाय योजना करण्याविषयी ग्वाही दिली.