जळगावात भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !

0

जळगाव । जळगाव शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ रस्ता ओलांडत असताना महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याला अज्ञात कंटेनरने चिरडल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून याबाबत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या भीषण अपघातात विशाल रमेश सोनार (वय अंदाजे ४०, रा. शिव कॉलनी, जळगाव) असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघाताचे स्वरूप इतके भीषण होते की, विशाल सोनार यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. विशाल सोनार हे पाळधीकडून जळगाव शहराकडे जाणाऱ्या रोडवर शिवकॉलनीजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी वेगाने आलेल्या एका अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. हा अपघात दुपारी अडीच वाजता घडल्यानंतर, कंटेनर चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.

मयत विशाल सोनार यांच्या खिशात त्यांचे ओळखपत्र आढळून आले. त्यावरून ते महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. या माहितीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ मृतदेहाचा पंचनामा केला आणि एका खाजगी वाहनातून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत विशाल सोनार यांच्या नातेवाईकांनी देखील रुग्णालयात धाव घेतली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीसांकडून फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.