राज्यातील दुकानांच्या वेळेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई | महाराष्ट्रामध्ये आता सुविधा दुकाने २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवता येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात, अशा दुकानांच्या कामकाजाच्या तासांवर पोलिसांनी घातलेले निर्बंध फेटाळून लावले आहेत. सुविधा दुकानांना २४/७ सुरू ठेवण्यास मनाई करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ग्राहक आणि रिटेल क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
२४/७ दुकानांवर बंदी नाही
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की, २४ तास सुरू राहणारी सुविधा दुकाने ही नागरिकांसाठी अत्यंत सोयीस्कर (Convenient) आणि फायदेशीर (Beneficial) आहेत. विशेषतः उशिरापर्यंत काम करणारे किंवा अनियमित वेळापत्रक असलेल्या लोकांसाठी अशी दुकाने खूप उपयुक्त ठरतात. जगभरात रात्रंदिवस सुरू राहणाऱ्या दुकानांची संकल्पना लोकप्रिय असल्याचेही खंडपीठाने नमूद केले.
कायद्याचा मुद्दा स्पष्ट करताना न्यायालयाने म्हटले की, सध्या महाराष्ट्रात असा कोणताही कायदा नाही जो सुविधा दुकानांना २४ तास सुरू ठेवण्यास मनाई करतो. कायद्यानुसार केवळ विशिष्ट प्रकारच्या आस्थापनांवरच वेळेचे निर्बंध आहेत. ‘केवळ हुक्का बार, परमिट रूम, डान्स बार (Dance bars) किंवा दारू विक्री करणाऱ्या आस्थापनांसाठीच र्बंध आहेत,’ असे न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यामुळे, सर्वसामान्य वस्तूंची विक्री करणाऱ्या सुविधा दुकानांना हे निर्बंध लागू होत नाहीत.