तरुणाची चाकुने वार करून खून ; पाचोऱ्यातील खळबळजनक घटना
पाचोरा । पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. जिथे किरकोळ कारणावरून २० वर्षीय तरुणावर चाकुने वार करत खुन केल्याची घटना घडली. घटनेतील मारेकऱ्यास पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन दिनांक १८ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. १२ वाजुन १५ मिनिटांनी मिरवणूक संपल्यानंतर हेमंत संजय सोनवणे (वय २०, रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) यास शहरातील बाहेरपुरा येथे संशयीत आरोपी रोहित गजानन लोणारी (वय २०, रा. शिव काॅलनी, पाचोरा) याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन घटना स्थळावरुन पसार झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होवुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तर हेमंत सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोहीत लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रोहित लोणारी यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे. रोहित लोणारी याने हेमंत सोनवणे याचा खुन का केला ? याचा पोलीस तपास करीत आहेत.