मराठी साहित्यासाठी AI चा वापर करा: देवेंद्र फडणवीस
आज सगळीकडे एआयचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी वापर केला पाहिजे. AI युगात जर आपण स्मॉल लँग्वेज मॉडेलमध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले. तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. त्यासाठी मराठी भाषा विभागाने एआयचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून (दि.३१) तिसरे विश्व मराठी संमेलन सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आयोजकांचे आभार मानतो की तुम्ही संमेलनाला मुंबईतून पुण्यात आणले. माझ्यासारख्या नागपुरी माणसाला पुण्याची मराठी प्रमाण आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे आभार मानतो.
मधू मंगेशक कर्णिक यांचा सत्कार आपण करतो आहोत, सृजनशील व्यक्तिमहत्व आज नाबाद ९३ आहेत. ते मराठीला समृद्ध करणारे आहेत. मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण होत नाही. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही केले. ही देखील आनंदाची गोष्ट आहे, त्याबद्दल मी स्वतःल भाग्यवान समजतो.
काही लोकांनी वाद उपस्थितीत केले, वाद निर्माण झाला नाही, तर ते संमेलन नाही. वाद, प्रतिवाद झालाच पाहिजे . मराठी माणसाला कलह करायला आवडतो. कोणी नावे ठेवते. त्यातून मंथन करायला मिळते. हे संमेलन वैश्विक केले आहे. एक ही देश नाही जिथे मराठी माणूस पोहोचला नाही. Davos मध्ये सुद्धा मराठी माणसे स्वागताला होती.
मी पुन्हा येईल, हे वाक्य मला पिच्छा सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो. जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल. तेव्हा मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठे ही असला, तरी तिथे गुणवत्ता आणतो. दुधात साखरेसारखे काम करतो. आनंद आहे की, आपण एकत्रित आहोत. कुठलं शहर किंवा देश सोयीचे असेल, यावर चर्चा करून ५ वर्षात ही संमेलन परदेशात घेऊ, असे सांगून परदेशात मराठी संमेलन घेऊन मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजवू, असेही ते म्हणाले.