इगतपुरीत १५८ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

0

आरटीईंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व विस्तार अधिकारी अशोक मुंढे आवाहन

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात आरटीईअंतर्गत खाजगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे १६ शाळांमध्ये १५८ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अर्ज दाखल करावेत असे आवाहन गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील व विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांनी केले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला यंदा मुदतीत प्रारंभ झाला आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार, खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलो ते आठवीसाठी प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.सर्व प्रकारच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत दुर्बल व वंचित गटातील बालकांना मोफत प्रवेश दिला जातो. शाळांना या शुल्काची प्रतिपूर्ती शासनामार्फत केली जाते. या निर्णयामुळे अनेक गरजू गरीब व सर्वसामान्यांनादेखील इंग्रजी माध्यमाच्या तसेच दर्जेदार शाळांमधील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते.

या ‘ संकेतस्थळावर माहिती भरा ‘
प्रवेशासाठी ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. पाल्याचा जन्म तारखेचा पुरावा, जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, पालकांचे व पाल्याचे आधारकार्ड, अपंगत्वाचा पुरावा तसेच ऑनलाइन दिलेल्या इतर कागदपत्रांसह पालकांनी https://student. maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर आपल्या पाल्याची ऑनलाइन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

इगतपुरी तालुक्यातील शाळांची नावे :- अभिनव इगतपुरी आदर्श घोटी,एंजल वाडीवऱ्हे, आर्य चाणक्य स्कूल घोटी, असीमा स्कूल आवळखेड, ब्राईट स्कूल वाडीवऱ्हे, चाणक्य स्कूल साकूर, फिनिक्स अकॅडमी मुंढेगाव, लिटिल ब्लॉसम स्कूल इगतपुरी, नित्यानंद इंग्लिश मीडियम स्कूल घोटी, पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूल टाके घोटी, प्रियदर्शनी इंटरनॅशनल स्कूल कवडदरा, राजलक्ष्मी स्कूल गोंदे, श्री सरस्वती स्कूल भरविर बुद्रुक, सिद्धकला इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे, स्पीडवेल स्कूल वाडीवऱ्हे वरील सोळा शाळांमध्ये एकूण १५८ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत २५ टक्के अंतर्गत प्रवेश मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.