ऐन हिवाळ्यात ग्राहकांना घाम फुटला; सोने 2300 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी वधारली
मुंबई । गेली दोन आठवडे सोने आणि चांदी दरात घसरण दिसून आली. मात्र या आठवड्यात दोन्ही धातूंनी पुन्हा एकदा उसळी घेतली. गेल्या चार दिवसांपासून सोने आणि चांदी दरात दरवाढ दिसून आली. या चार दिवसात गुंतवणूकदारांनी कमाईचा चौकार हाणला. तर ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. या चार दिवसात सोन्याने 2300 रुपयांची भरारी घेतली तर चांदी 2500 रुपयांनी महागली. या किंमतींमुळे ऐन हिवाळ्यात ग्राहकांना घाम फुटला आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत
सोने 2300 रुपयांनी वधारले
गेल्या आठवड्यात सोने वधारले नव्हते. या आठवड्यात सलग चार दिवस मोठी वाढ झाली. चार दिवसात 2300 रुपयांनी दर वधारले. सोमवारी 660, मंगळवारी 760 रुपयांची तर बुधवारी सोन्याने 550 रुपयांची दरवाढ झाली. 21 नोव्हेंबर रोजी सोने 300 रुपयांनी वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी 2500 रुपयांनी वधारली
मागील दोन आठवड्यात चांदीत नरमाईचे सत्र होते. तर या आठवड्यात चांदीने 2500 रुपयांची मुसंडी मारली. 19 नोव्हेंबर रोजी किंमत 2 हजार रुपयांनी वधारली. 20 नोव्हेंबर रोजी 500 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.