‘शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा
आहुति' दिवाळी विशेषांकाच्या शानदार प्रकाशन सोहोळ्यात ख्यातनाम दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांचे आवाहन
मुंबई | शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा अशा शब्दांत ख्यातनाम दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त यांनी ‘आहुति’ दिवाळी विशेषांकाच्या शानदार प्रकाशन सोहोळ्यात आवाहन केले. साप्ताहिक आहुतिचा ५८ वा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन, अमेय पालक संघटना, घरकुल, डोंबिवली जवळील खोणी गावात अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. “विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था” या विषयावर प्रकाशित करण्यात आलेला हा दिवाळी विशेषांक घरकुलच्या विशेष मुलांच्या सहवासात प्रकाशित करण्यात आला.
यावेळी ९२ वर्षांचे ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त हे बोलत होते. अमेय पालक संघटनेच्या “चला मैत्री करू या” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु करण्यात आलेल्या “संवाद” या दूरदृश्य प्रणालीच्या पाक्षिकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. जेष्ठ पत्रकार दिनकर गांगल हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते.
घरकुलच्या प्रथेप्रमाणे आहुति दिवाळी विशेषांक प्रकाशन आणि घरकुलचे वेगळ्या वळणावर, “संवाद” या ऑनलाइन पाक्षिकाचे प्रकाशन करण्यात आले. सुरुवातीला अविनाश बर्वे, सौ. नंदिनी बर्वे यांनी उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांना विविध फलकांचे वाचन करून माहिती देण्यात आली. घरकुलच्या सभागृहात कार्यक्रमाला सुरुवात झाली. घरकुल मधील विशेष मुलांनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले. साप्ताहिक आहुतिचे संपादक गिरीश वसंत त्रिवेदी यांनी प्रास्ताविक केले. सौ नंदिनी बर्वे यांनी घरकुल ची माहिती सांगितली. घरकुल मधील मुलांनी नाटिका सादर केली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर यांच्या कन्या आणि कर्नल श्रीराम पेंढारकर यांच्या पत्नी सौ. सुप्रिया पेंढारकर यांचा विशेष परिचय अविनाश बर्वे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला करून देऊन राजदत्त यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे पद्मभूषण राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल, डॉ. विनोद इंगळहळीकर, प्रा. उषा बाळ, पुरुषोत्तम बुरडे, डॉ. अद्वैत पाध्ये, अविनाश बर्वे, सौ. नंदिनी बर्वे, सुनिल जाधव आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि दिवाळी विशेष अंक देऊन सत्कार करण्यात आला. आहुतिच्या प्रथेप्रमाणे मान्यवरांवर शांती मंत्र पठण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. श्रीमती आशा दलाल आणि सौ. संध्या म्हात्रे यांनी शांती मंत्राचे पठण केले. कार्यकारी संपादक सौ. मनीषा त्रिवेदी यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसिद्ध निवेदक, प्रतापगडावरील देवीचे पुजारी जगदीश हाडप यांनी सूत्रसंचालन केले.पद्मभूषण राजदत्त यांनी आहुति परिवाराचे विशेष कौतुक केले. आज ह्या कार्यक्रमात येऊन खूप आनंद झाला, हे सगळं बघून एका म्हणीची आठवण झाली, brighten the corner where you are अर्थात तुम्ही जिथे कुठे असाल तिथे थोडा तरी अंधार दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि चांगले काम करण्यासाठी वयाचे बंधन नसावे. समाजहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहा, चालत राहा, चालत राहा असे सांगून राजदत्त यांनी उपस्थितांना अभिवादन केले.
विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था या विषयावरती गिरीश त्रिवेदी यांनी दिवाळी विशेषांक प्रकाशित केले हे कौतुकास्पद आहे. गेली अनेक वर्षे गिरीश त्रिवेदी आणि प्रशांत मोरे हे दिवाळी विशेष अंक एका विषयावर प्रकाशित करीत असून हे अंक वाचनीय आणि संग्राह्य आहेत. या विषयी त्यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झाली आहे. त्यांची ही वाटचाल अशीच अविरत सुरु राहो असे ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. अशा विषयावर आपण सर्वानी एकत्र येऊन ही समस्या समाजातून कायमस्वरूपी कशी नाहीशी करता येईल यासाठी प्रयत्न करू या असे आवाहनही दिनकर गांगल यांनी केले.
आहुति चा हा दिवाळी विशेष अंक खरोखरच वाचनीय आहे. आत्ताच्या काळात विशेष मुलांच्या व्यथा आणि व्यवस्था ह्या विषयावर अंक काढण्याचा विचार करणे म्हणजे खरोखरच धाडस आहे. दिवाळी विशेष अंक आणि तो सुद्धा अशा गहन विषयावर प्रसिद्ध करणे हे धाडस आहे आणि हे धाडस गिरीश त्रिवेदी, सौ. मनीषा त्रिवेदी यांनी केले आहे. त्यांचे कौतुक करायला पाहिजे असे गौरवोद्गार डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी आपल्या मनोगतात काढले. सगळी आर्थिक गणित बघता ह्या विषयावर अंक काढावासा वाटला ह्या बद्दल गिरीष त्रिवेदी आणि सौं मनीषा त्रिवेदी यांचं विशेष अभिनंदन. आता आपली वाचकांची जबाबदारी आहे की आपण हा अंक विकत घेतला पाहिजे, अगदी एक अंक नाही तर दहा दहा अंक घेऊन आपण आपल्या मित्र मंडळीना भेट म्हणून दिला पाहिजे असे आवाहन डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी केले.
अमेय पालक संघटनेच्या “चला मैत्री करू या” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु करण्यात आलेल्या “संवाद” या दूरदृश्य प्रणालीच्या पाक्षिकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.
विद्यानिकेतन चे प्रमुख विवेक पंडित, आहुति चे सल्लागार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी, मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ शाखेचे अध्यक्ष प्रा. भगवान चक्रदेव, विजय बर्वे, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे शिरीष बेंडाळे, सूर्योदय को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन शोभा शेट्टी, श्री गजानन महाराज सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष संजय दलाल, विद्यमान अध्यक्ष आशा दलाल, उपाध्यक्ष सौ. संध्या म्हात्रे, अंबरनाथ जय हिंद बँकेच्या संचालक सौ. रूपा देसाई जगताप, सुयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा वासंती सरदेसाई, सौ. सुप्रिया पेंढारकर, शैला आचार्य, अनुराधा जुवेकर, शिवभक्त राजू देसाई, एड. शशिकला रेवणकर, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे माजी अध्यक्ष सीए हेमंत गोपटे, माजी अध्यक्ष दीपक रेवणकर, अंबरनाथ मेडील असोसिएशनचे डॉ. गणेश राठोड, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट चे माजी अध्यक्ष दत्ता घावट, अंबरनाथ संगीत सभेचे सचिन सरदेसाई, चित्रकार अनिल डावरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.