मुंबई । राज्यातील विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाजपला धक्क्यांवर धक्के देत आहे. आता अशातच काँग्रेसने देखील भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे.
भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. दोन बड्या नेत्यांनी अचानक साथ सोडल्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला.
मात्र, तरी देखील लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून आला. आता विधानसभेपूर्वी राजकीय वारं फिरलं असून भास्करराव खतगावकर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.