जळगाव बीएचआरच्या अवसायकासह दोघांना लाच घेताना अटक

0

जळगाव । दीड लाखाची लाच स्वीकारताना भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, रा. नागपूर) यांच्यासह वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत असे की, तक्रारदार यांची आई व मोठाभाऊ यांनी बीएचआरमधून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले होते. त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी किती रक्कम भरावी लागेल याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते. यावेळी संस्थेत काम करणारे वसुली अधिकारी सुनील पाटील याने तक्रारदाराची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या मुद्दल कर्जाच्या रकमेतील पाच टक्के रक्कम भरण्यासाठी अवसायकांकडून परवानगी मिळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली तक्रारदाराने ही रक्कम कमी करण्यासाठी अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडे विनंती केली, मात्र त्यांनी लाचेची रक्कम कमी होणार नसून ती रक्कम वसुली अधिकारी सुनील पाटील याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितले.

तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनील पाटील याला लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.