महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा ; जळगावातही बरसणार
मुंबई । सध्या राज्यात ऐन उन्हाळयात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं (IMD)दिलेल्या इशाऱ्यानुसार आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपिटीचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र नुसता पाऊस पडणार नसून वादळी वारे आणि गारपिटीच्या रुपाने राज्यावर दुहेरी संकट असणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील आज पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज सकाळी अशंतः ढगाळ वातावरण होते सायंकाळच्या सुमारास किंवा रात्री हलका पाऊस मेघगर्जनेसह पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.