बेशिस्त वाहनचालक आणि टवाळखोरांना जळगाव पोलिसांचा इंगा; जिल्हाभरातील नाकाबंदीत पावणेपाच लाखांचा दंड वसूल

0

जळगाव : जिल्ह्यात कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष नाकाबंदी व तपासणी मोहीम’ हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान तब्बल २,२०० वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या धडक कारवाईत विविध नियमभंगांच्या ५७६ केसेस नोंदवून पोलिसांनी ४ लाख ७२ हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे जिल्ह्यातील बेशिस्त चालक आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या प्रमुख कारवायांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

मद्यपी आणि अमली पदार्थ सेवन करणारे: मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या (ड्रंक अँड ड्राइव्ह) २० चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच उघड्यावर दारू पिणाऱ्या १२ जणांवर आणि उघड्यावर गांजा ओढणाऱ्या ७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

ट्रिपल सीट आणि ध्वनी प्रदूषण: नियमांकडे दुर्लक्ष करून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४७ वाहनचालकांना दणका देण्यात आला. यासोबतच कर्कश हॉर्न वाजवणारी २ वाहने आणि कर्कश सायलेंसर लावलेले १ वाहन अशा एकूण ३ वाहनांवर ध्वनी प्रदूषणाप्रकरणी कारवाई झाली.

इतर कायदेशीर कारवाई: मोटार वाहन कायद्याच्या कलम ६६/१९२ नुसार ४ केसेस दाखल करण्यात आल्या असून, नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी ३ वाहने पोलिसांनी जप्त (जमा) केली आहेत.

जिल्ह्यातील रस्ते अधिक सुरक्षित व्हावेत आणि नागरिकांना शांततेत जगता यावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी जबाबदारीचे भान राखून वाहतूक नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.