सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून सातारा-पंढरपूर रस्त्यावरील रखडलेल्या पूल व मोरी कामांचा आढावा

0

कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सातारा-पंढरपूर रस्त्यावरील माहुली व कोरेगाव परिसरातील पूल आणि मोरी कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीत रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे, पुलांचे रुंदीकरण तसेच सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पोहोच रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असून, मेडिकल कॉलेजसमोरील रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने तसेच कॅनॉलवरील पुलाचे रुंदीकरण न झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली.

काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली असून, काही ठिकाणी पूर्ण झालेली कामे उखडून खराब झाल्याचेही निदर्शनास आले. माहुली येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने ते अधिक वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खावलीजवळील अरुंद पूल आणि रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. तसेच कोरेगाव रेल्वे स्टेशन परिसरातील वसना नदीवरील लासुर्णे नवीन पुलाचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट आहे. कोरेगाव शहरातील निळगंगा नदीवरील अस्तित्वातील पूल अरुंद असल्याने या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम व रुंदीकरण करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी विविध कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मात्र, नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता, रखडलेली कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सदर कामांचा सविस्तर आढावा घेताना कामांच्या अंमलबजावणीला गती देणे, कामांचा दर्जा राखणे आणि अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणे यावर भर देण्यात आला. नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) श्री. आबासाहेब पंडितराव नागरगोजे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.