जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’
बालचित्रपटांसोबतच युवा जादूगार चेतनकुमार यांच्या जादूचे प्रयोग; प्रवेश विनामूल्य

जळगाव : बालचमूंसह त्यांच्या पालकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवता यावी, यासाठी जळगावात २८ व २९ नोव्हेंबर रोजी ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव – पर्व २’ चे आयोजन करण्यात आले आहे. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव भाऊंचे उद्यान येथील ॲम्फी थिएटरमध्ये दररोज सायंकाळी ५.३० वाजता रंगणार आहे.


महोत्सवात दर्जेदार आणि मनोरंजक बालचित्रपटांची मेजवानी अनुभवण्याची संधी बालकांना व त्यांच्या पालकांना मिळणार आहे. याशिवाय राष्ट्रीय ‘जादूश्री’ पुरस्काराने सन्मानित युवा जादूगार चेतनकुमार यांच्या अद्भुत जादूच्या प्रयोगांची विशेष पर्वणीही रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यांच्या हातचलाखीचे आणि विस्मयकारक प्रयोग महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद व एकत्रित आनंदाचे क्षण कमी होत चालले आहेत. हीच बाब लक्षात घेऊन पालकांनी मुलांसोबत चित्रपटांचा आनंद घेत स्वतःचे बालपणही पुन्हा अनुभवावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोरंजनासोबतच बालविश्वाशी नाते जोडणारे चित्रपट या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत.
शनिवार, दि. २८ आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ असे दोन दिवस हा महोत्सव पार पडणार आहे. विशेष म्हणजे, महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जळगाव शहरातील विद्यार्थी, बालचमू आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बालचित्रपट व जादू महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.