जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर
गेल्या दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज बाजार सुरू होताच सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याचा भाव 1 लाख 24 हजार 800 रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदी आता 1 लाख 53 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र अचानक झालेल्या दरवाढीमुळे अनेक ग्राहकांनी खरेदीचा निर्णय पुढे ढकलला. मात्र, गेल्या दोन दिवसांत दोन्हीच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना दर आणखी घसरतील, अशी अपेक्षा होती. काही ग्राहकांनी तर दर कमी होण्याची वाट पाहत खरेदी करण्याचे नियोजन केले होते.
पण आज बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची आणि चांदीच्या दरात चार हजार रुपयांची वाढ झाल्याने खरेदीदारांना आता पुन्हा विचार करावा लागणार आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात सध्या अस्थिरता कायम असल्याने पुढील दिवसांत दर वाढतात की घसरतात, याकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.