मुंबई दहशतवादी हल्ल्यातील फरार आरोपींविरोधात आंतरराष्ट्रीय कारवाईला वेग; उज्ज्वल निकमांची माहिती

0

जळगाव । २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फाशी देण्यात भारताला यश आले असले, तरी पाकिस्तानात लपून बसलेल्या इतर फरार आरोपींविरोधात आता आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनांशी संबंधित आरोपींसह, हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना देणाऱ्या ‘हँडलर्स’विरोधात नवीन कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या फरार आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी इंटरपोलच्या (Interpol) माध्यमातून वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या कायदेशीर कारवाईचे ठोस परिणाम लवकरच पाहायला मिळतील आणि फरार आरोपींवर नक्कीच कारवाई होईल, असा ठाम विश्वासही उज्ज्वल निकम यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.