अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव २०२६ ची नामांकने जाहीर

0

अंबरनाथ : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाकार, लेखक, दिग्दर्शक व तंत्रज्ञांच्या कलागुणांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या *अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव २०२६* च्या विविध पुरस्कार विभागांतील नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संगीत, छायाचित्रण, संकलन आणि इतर तांत्रिक विभागांसह वेब सिरीज व वेब चित्रपटांचाही समावेश करण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात ‘देऊळबंद २’, ‘मर्दिनी’ आणि ‘मॅजिक’, तर सामाजिक चित्रपट विभागात ‘इरावती’, ‘अंत एक प्रारंभ’ आणि ‘महाराष्ट्र फाईल्स’ यांना नामांकन मिळाले आहे. मनोरंजनात्मक चित्रपट विभागात ‘भागुबाई’, ‘लग्नाचा शॉट’ आणि ‘मंगलाष्टक रिटर्न’ यांच्यात स्पर्धा रंगणार आहे. अभिनय विभागात जितेंद्र जोशी, मंगेश देसाई, प्रथमेश परब, भूषण प्रधान, पूजा सावंत, प्रियदर्शनी इंदलकर, प्रार्थना बेहरे, स्मिता तांबे यांसारख्या कलाकारांना नामांकन मिळाले आहे. त्याचबरोबर कथा, पटकथा आणि दिग्दर्शन विभागात प्रवीण तरडे, निलेश नाईक, डॉ. दिनेश वैद्य, नंदू परदेशी यांच्यासह अनेक मान्यवरांची नावे आहेत. संगीत, गायन आणि तांत्रिक विभागांमध्येही अनेक गुणवंतांना संधी मिळाली आहे.

यंदाच्या महोत्सवात विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांना जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ दिग्दर्शक पीतांबर काळे यांना कारकीर्द गौरव पुरस्कार, ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश बिडकर यांना तंत्रज्ञ गौरव पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांना ‘अंत एक प्रारंभ’ या चित्रपटासाठी स्मृती सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांना लक्षवेधी अभिनय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. ‘द्विधा’ चित्रपटाला विशेष परीक्षक पुरस्कार, तर ‘पत्री सरकार’ला सर्वोत्कृष्ट चरित्रपटाचा सन्मान जाहीर झाला आहे.

या महोत्सवाचे आयोजन अंबर भरारी, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने करण्यात येत आहे. महोत्सवाचे आयोजक म्हणून सुनील चौधरी, गुणवंत खिरोदिया आणि निखिल चौधरी काम पाहत आहेत. महोत्सवाचे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक महेंद्र पाटील जबाबदारी सांभाळत आहेत.

महोत्सवाच्या नियोजन आणि आयोजनात चित्रपटसृष्टीतील लेखक-दिग्दर्शक तसेच अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव समितीचे सदस्य *महेश सुभेदार, जगदीश हाडप, अमेय रानडे, कविता करंबेळकर, दत्ता घावट आणि डॉ. गणेश राठोड* यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे.

मराठी चित्रपटांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांना प्रोत्साहन देणे, दर्जेदार चित्रपटांची दखल घेणे आणि ज्येष्ठ कलावंतांच्या योगदानाचा सन्मान करणे हा या महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. नामांकनांची घोषणा झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी पुरस्कार सोहळ्याची चित्रपट रसिक आणि कलावंतांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.