जळगावात सोनं-चांदी स्वस्त! आजच्या घसरणीनंतर किती झाले दर?
सोनं आणि चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असताना आज, १३ नोव्हेंबर रोजी जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली आहे.

सोन्याचा भाव १.३६ लाखांवर
आजच्या घसरणीनंतर जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १ लाख ३६ हजार रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २५ हजार रुपये इतका आहे. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


चांदीच्या दरातही मोठी घसरण
चांदीच्या बाजारातही आज मोठी घसरण झाली. जळगावमध्ये चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ८१ हजार रुपये झाला आहे. गुरुवारी चांदी १ लाख ८५ हजार रुपये प्रति किलो होती. म्हणजेच एका दिवसात चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाली आहे.
काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठा बदल
सोन्याच्या दरातील गेल्या काही दिवसांची स्थिती पाहिली तर बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. ८ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव सुमारे १ लाख ४२ हजार रुपये होता. त्यानंतर दरात चढ-उतार होत आज तो १ लाख ३६ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीचे दर कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
खरेदीपूर्वी अंतिम दर तपासा
दरम्यान, बाजारातील सोन्या-चांदीचा दर आणि दागिन्यांची अंतिम किंमत यामध्ये फरक असू शकतो. दागिने खरेदी करताना जीएसटी, घडणावळ तसेच इतर शुल्क लागू होतात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून त्या दिवसाचा ताजा दर आणि दागिन्यांची अंतिम किंमत निश्चित करून घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.