जिल्हा बँक निवडणुकीच्या पाचोरा मतदारसंघात मोठा ट्विस्ट; सुमित पाटलांचा अर्ज वैध ठरल्याने बिनविरोध निवडणुकीला ब्रेक!

0

जळगाव । जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. छाननीच्या फेरीत बाद ठरलेला शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अपिलात वैध ठरवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सतीश शिंदे यांच्या बिनविरोध निवडीवर पाणी फेरले गेले असून, या मतदारसंघात आता भाजप आणि शिंदे गटात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय होता नेमका वाद?
पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून सुमित किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी सुमित पाटील यांच्या अर्जावरील ठरावाबाबत तांत्रिक आक्षेप घेत हरकत घेतली होती. या हरकतीवर सुनावणी घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुमित पाटील यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यामुळे या मतदारसंघात सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात होती.

नाशिक सहनिबंधकांकडून दिलासा
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी थेट नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर सुनावणी होऊन न्यायालयाने किंवा संबंधित प्राधिकाऱ्याने सुमित पाटील यांच्या बाजूने निर्णय देत त्यांचा अर्ज वैध ठरवला आहे. या दिलाशामुळे सुमित पाटील यांचा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश झाला असून, त्यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अत्यंत अटीतटीची होणार आहे.

स्थानिक राजकीय संघर्षाला धार
एका बाजूला भाजपचे सतीश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील आमनेसामने आल्यामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय संघर्ष आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. दोन्ही बाजूंनी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असल्याने आगामी काळात या मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. अर्जांच्या अंतिम स्थितीनंतर आता या हायव्होल्टेज निवडणुकीत कोण माघार घेणार की थेट सामना रंगणार, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.