लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीला झळाळी; जळगावच्या बाजारात खरेदीची धूम

0

जळगाव । शुद्ध सोन्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दीपावलीच्या या पवित्र पर्वात घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदावे, यासाठी सोने व चांदीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. हीच परंपरा कायम राखत जळगावकर नागरिकांनी आज सोने आणि चांदीच्या खरेदीला भरभरून पसंती दिली.

आज बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १ तोला १,३०,०७० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १,४२,००० रुपये इतका नोंदवला गेला. तसेच, चांदीचे दर प्रति किलो १,८८,००० रुपयांवर पोहोचले होते. दर वाढलेले असले तरीही नागरिकांच्या उत्साहात आणि श्रद्धेत कोणतीही कमी दिसून आली नाही.

ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरातील सराफ व्यावसायिकांनी देखील विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू आणि दागिन्यांची रेलचेल उपलब्ध करून दिली होती. यात विशेषतः:महालक्ष्मीचे आणि कुबेराचे प्रतिमेचे सोन्या-चांदीचे शिक्के,चांदीच्या आकर्षक लक्ष्मी-गणेश मूर्ती,लहान वजनाचे सोन्याचे तुकडे आणि पारंपरिक दागिने, यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड रिघ लागली होती. 

यंदाच्या वर्षी विशेषतः चांदीच्या लक्ष्मी मूर्ती आणि चांदीचे शिक्के खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल राहिल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.सकाळपासूनच जळगावच्या सुवर्ण बाजारातील प्रत्येक दुकानात ग्राहकांची ये-जा सुरू होती. लहान व्यावसायिकांपासून ते उच्चमध्यमवर्गीय नागरिकांपर्यंत सर्वांनीच आपापल्या बजेटनुसार छोट्या-मोठ्या स्वरूपात सोने-चांदीची खरेदी केली. पारंपारिक श्रद्धा आणि सणाचा आनंद जपत जळगावकरांनी यंदाही सोने खरेदीची परंपरा उत्साहात साजरी केल्याचे चित्र संपूर्ण बाजारपेठेत दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.