रोहित पवारांना ‘मीडिया फोबिया’, कुंभमेळ्याला बदनाम करू नका; मंत्री गिरीश महाजन यांचा पलटवार

0

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “रोहित पवारांना मीडिया फोबिया झाला असून ते निव्वळ प्रसिद्धीसाठी असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी कुंभमेळा आणि पर्यायाने हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये,” असा सज्जड इशारा महाजन यांनी दिला. आपल्या ३५ ते ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नाशिकमधील टेंडर प्रक्रियेइतकी पारदर्शक प्रक्रिया कधीच पाहिली नाही, असा दावा करत त्यांनी रोहित पवारांनी केवळ हवेत गप्पा न मारता अधिकृत कागदपत्रांसह आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे थेट आव्हान दिले. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी या प्रकरणासह राज्यातील विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सरकार आणि पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली.

राज्यात चर्चेत असलेल्या बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री महाजन यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. निष्पाप रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. बिहार आणि उत्तर प्रदेशमधून बनावट पदव्या आणल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असून, या सर्व तक्रारींची राज्य सरकारमार्फत अत्यंत सखोल चौकशी केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ व त्यांच्या पुत्रांना ईडीकडून मिळालेल्या दिलाशावर विचारले असता महाजन यांनी स्पष्ट केले की, हा संपूर्ण विषय न्यायप्रविष्ट आणि तांत्रिक स्वरूपाचा आहे. ईडी ही एक स्वायत्त यंत्रणा असून ती मुख्यमंत्र्यांच्या किंवा सरकारच्या अखत्यारीत काम करत नाही. संबंधित प्रकरणात ठोस पुरावे हाती लागले नसतील, म्हणूनच तपास यंत्रणेने तसा अहवाल सादर केला असावा; यंत्रणा केवळ नियमांनुसारच आपले काम करते, असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.