भुसावळमध्ये एमडी ड्रग्जचा मोठा साठा पकडला; पहाटेच्या कारवाईत चौघे पोलिसांच्या ताब्यात
जळगाव । भुसावळ परिसरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी पहाटे मोठी मोहीम राबवली. किन्ही एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाचा साठा पोलिसांच्या हाती लागला. तब्बल ६२.२१ ग्रॅम एमडी पावडरसह दोन दुचाकी आणि चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख २८ हजार ८४० रुपये आहे.

शुक्रवारी, ६ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास भुसावळ तालुका पोलिसांना किन्ही एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तालुका पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोबत घेत कारवाईची तयारी केली. पहाटे २.५५ वाजता पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईत चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले.


पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये कंडारी येथील रिशभ कुणाल खेडकर (१८), दादासाहेब रुपवते सोसायटीतील प्रथमेश दिलीप आव्हाड (२७), नसरंजी फाईल येथील शेख अफजल शेख रहेमतुल्ला (२६) आणि अयान कॉलनीतील असगरखान अनवरखान (५७) यांचा समावेश आहे. हे सर्वजण भुसावळ येथील रहिवासी आहेत.
असगरखानकडून सर्वाधिक एमडी जप्त
संशयितांची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन पावडर मिळाली. या साठ्याची बाजारातील किंमत २ लाख ४८ हजार ८४० रुपये असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ५५.३३ ग्रॅम एमडी एकट्या असगरखान अनवरखान याच्याकडून मिळाली. त्यामुळे या प्रकरणातील त्याची भूमिका तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे. ड्रग्जव्यतिरिक्त पोलिसांनी रॉयल एनफिल्ड बुलेट आणि पल्सर या दोन दुचाकीही जप्त केल्या. त्यांची किंमत ३ लाख २५ हजार रुपये आहे. तसेच आयफोन १६, आयफोन १३ यांसह चार मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून, त्यांची किंमत १ लाख ५५ हजार रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ड्रग्जचा पुरवठा कुठून? पोलिसांकडून तपास सुरू
या कारवाईनंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६ नोंदवण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले एमडी ड्रग्ज कुठून आणले होते, त्याची विक्री कोणाला केली जाणार होती आणि या व्यवहारामागे आणखी व्यक्ती आहेत का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह तालुका पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. या कारवाईमुळे भुसावळमधील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.