नागपूर-मुंबई मार्गावर १२ विशेष फेऱ्या, जळगावसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे
जळगाव : दिवाळी आणि छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर आणि मुंबईदरम्यान दोन विशेष एक्स्प्रेस चालविण्याचे नियोजन केले आहे. नोव्हेंबर महिन्यात या गाड्यांच्या एकूण १२ फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे, या गाड्यांना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवर थांबा मिळणार असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सणासुदीच्या काळात नागपूर-मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीसाठी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेंद्रकुमार बुरड आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य महेंद्र कोठारी यांनी पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार स्मिता उदय वाघ आणि आमदार चैनसुख संचेती यांनीही रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. या प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेने दोन विशेष गाड्यांना मंजुरी दिली आहे.


नागपूर-एलटीटीदरम्यान आठ फेऱ्या
गाडी क्रमांक ०१०८४/०१०८३ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या एकूण आठ फेऱ्या होतील. नागपूरहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी गाडी ५, ७, १० आणि १२ नोव्हेंबर रोजी धावणार आहे. तर मुंबईहून नागपूरकडे परतणारी गाडी ६, ८, ११ आणि १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रवाना होईल. अशा प्रकारे दोन्ही दिशांनी प्रत्येकी चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
सीएसएमटी-नागपूर मार्गावर चार फेऱ्या
दुसरी विशेष गाडी क्रमांक ०१०८५/०१०८६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणार आहे. सीएसएमटीहून नागपूरकडे जाणारी गाडी ७ आणि ९ नोव्हेंबर रोजी सुटेल. तर नागपूरहून सीएसएमटीकडे जाणारी गाडी ८ आणि १० नोव्हेंबर रोजी धावणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशांनी प्रत्येकी दोन, अशा एकूण चार फेऱ्या होतील.
चाळीसगाव, जळगाव आणि भुसावळला थांबा
या विशेष गाड्यांना उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यात चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांचा समावेश आहे. याशिवाय मार्गावरील इतर प्रमुख स्थानकांवरही गाड्या थांबणार आहेत. त्यामुळे दिवाळी आणि छटपूजेसाठी मुंबईहून गावी जाणाऱ्या तसेच सणानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.