दिवाळीत रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! नागपूरसाठी ८ विशेष फेऱ्या; जळगाव, भुसावळसह नाशिक रोडला थांबा
नाशिक : दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातून नागपूर तसेच झारखंडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरदरम्यान आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असून, या गाडीला नाशिक रोड आणि मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. याशिवाय लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया विशेष गाडीच्या सेवेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.दिवाळी आणि छठ उत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.

त्यामुळे नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे नियोजन केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस ही द्विसाप्ताहिक सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस एकूण आठ फेऱ्या करणार आहे. गाडी क्रमांक ०१०८९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ९.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या चार फेऱ्या होतील. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०९० नागपूर येथून ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी आणि सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्याही चार फेऱ्या नियोजित आहेत. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.


त्यामुळे नाशिक आणि मनमाड परिसरातील प्रवाशांना नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया विशेष गाडीच्या सेवेलाही विस्तार देण्यात आला आहे. यापूर्वी २७ ऑक्टोबरपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक ०८६१० आता ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान दर मंगळवारी धावणार आहे. हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी क्रमांक ०८६०९ ही २ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी धावेल. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी पाच फेऱ्या होतील. आरक्षण ऑनलाइन उपलब्ध विशेष गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य दराने काढता येतील. रेलवन ॲपद्वारेही तिकीट आरक्षित करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲपला भेट देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
नागपूरसाठी नाशिक रोड, मनमाडला थांबा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नाशिक आणि मनमाड परिसरातील प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर ही सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९.४५ वाजता सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात नागपूरहून दर शुक्रवारी आणि सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता गाडी सुटेल. नाशिक रोड, मनमाडसह ठाणे, कल्याण, जळगाव, भुसावळ, अकोला आणि वर्धा येथे या गाडीला थांबे असतील. या विशेष गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. दिवाळी आणि छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या सेवेलाही मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर मंगळवारी धावणारी गाडी क्रमांक ०८६१० आता ३ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तर हटिया येथून दर सोमवारी सुटणारी गाडी क्रमांक ०८६०९ ही २ ते ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. यापूर्वी या गाड्यांच्या सेवा ऑक्टोबरअखेरपर्यंतच अधिसूचित करण्यात आल्या होत्या. आता प्रत्येकी पाच फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात झारखंडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.