जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९३ उमेदवारांचे अर्ज बाद; संजय पवार, अनिल पाटलांना धक्का, रक्षा खडसेंचा अर्ज कायम
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. छाननीदरम्यान एकूण ४०२ अर्जांपैकी ९३ अर्ज अवैध ठरविण्यात आले. या यादीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील तसेच आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या या नेत्यांसमोर आता अपीलाचा पर्याय उरला आहे. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हाभरातून विविध मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर ९३ अर्ज अवैध ठरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीच्या पुढील टप्प्यात जाण्यापूर्वीच अनेक इच्छुकांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील यांचे अर्ज अवैध
छाननी प्रक्रियेतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय पवार आणि आमदार अनिल पाटील यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरणे. हे दोन्ही नेते मागील सलग दहा वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या अर्जांबाबतच्या निर्णयाकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. आता अर्ज बाद झाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेत ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या मुलाचा अर्जही बाद
पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांच्या अर्जावर सतीश परशुराम शिंदे यांनी हरकत घेतली. पात्रतेसंदर्भात उपस्थित केलेल्या आक्षेपानंतर छाननीत सुमित पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीच्या समीकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
रक्षा खडसेंविरोधातील आक्षेप फेटाळला
दुसरीकडे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावरही थकबाकीदार असल्याच्या कारणावरून हरकत घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरणार की बाद होणार, याकडे लक्ष होते. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. संबंधित हरकतीचा विचार केल्यानंतर ती फेटाळण्यात आली. परिणामी, रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे.
अपीलाच्या निर्णयाकडे लक्ष
छाननीत अवैध ठरलेल्या उमेदवारांना निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करता येणार आहे. त्यामुळे अर्ज बाद झालेल्या उमेदवारांकडून पुढील कायदेशीर पाऊल कोणते उचलले जाते, याबाबत उत्सुकता आहे.