जळगाव हादरले ! कौटुंबिक वादातून तरुणाचा खून; संशयित मेहुणा अटकेत
जळगाव । कौटुंबिक वादातून जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात झालेल्या एका थरारक हल्ल्यात २७ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी घडली. सनी विनोद डोळे (वय २७, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत सनी डोळे आणि त्याचा मेहुणा तथा बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यामध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होता. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. या वादातून संशयित आरोपी सुरज वानखेडे याने आक्रमक होत सनीवर धारदार शस्त्राने अचानक प्राणघातक हल्ला केला.


नातेवाइकांवरही हल्ला; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
या हल्ल्यात सनी डोळे गंभीर जखमी झाला. तसेच, वाद सोडवताना किंवा बचावाच्या प्रयत्नात सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली. घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सनीला तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
आक्रोशाने सुन्न झाले वातावरण
ऐन तारुण्यात असलेल्या तरुण मुलाचा असा अचानक अंत झाल्यामुळे त्याच्या आई आणि आजीने रुग्णालयात केलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. या दुर्दैवी घटनेमुळे डोळे कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच, कौशल्याने कारवाई करत संशयित आरोपी सुरज वानखेडे याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. वृत्त लिहीपर्यंत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.