जळगाव जिल्ह्यात महायुतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार अनिल पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पक्ष सोडताना निलेश पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवसेनेत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना बोलावले जात नव्हते, असा आरोप त्यांनी केला. तसेच, महापालिका निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या मातोश्रींच्या विरोधात काम केल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली; याच राजकीय कटूतेमुळे आणि नाराजीतून आपण अखेर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे निलेश पाटील यांनी स्पष्ट केले.


निलेश पाटील यांनी २००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले असून, या काळात त्यांनी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर २०१७ ते २०२३ या काळात त्यांनी शिवसेना मध्ये प्रवेश करून जिल्हाप्रमुख आणि नंतर जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून महत्त्वाची पदे भूषवली होती. आता त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पुनरागमन केले आहे.