शेठ एन.के.टी. बँक्वेट हॉल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ शेठ एन.के.टी. बँक्वेट हॉल येथे श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते कॅमेऱ्याचे उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. त्यांचे नाव केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात आदराने घेतले जाते. त्यांनी दिलेल्या विचारांतून प्रत्येक समाजाने शिकण्याची गरज आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळात परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि बॅरिस्टरची पदवी मिळवली. मात्र आजच्या काळातही शिक्षणापासून काही समाजघटक मागे राहिलेले दिसून येतात. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे जाणे आणि व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे, असे आवाहन नानजीभाई ठक्कर यांनी केले.


ते पुढे म्हणाले की, समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन शिक्षण आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचेल आणि समाजात जनजागृती निर्माण होईल, यात शंका नाही.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करण्यात आला. दरियातून सोने काढून रमाबाईंना सोन्याची साडी भेट दिल्याचा प्रसंगही त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण आठवण म्हणून यावेळी सांगण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट त्यांच्या विचारांचा, संघर्षाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक श्री लक्ष्मण मोरे, श्री राजेश गायकवाड, तसेच श्री भास्कर हिमप्रा शेट्टी, सौ. वंदना (लेखिका व अभिनेत्री), श्री महेंद्र सोनावणे, श्री सुनील जगताप, श्री राजेश पडवळे, श्री रोहित पिसाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चित्रपटाचे पुढील चित्रीकरण सोलापूर येथे होणार असून, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर २०२७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.