ग्रामसभेत प्रश्नावरून वाद; माजी सरपंचाकडून तरुणाला मारहाण

0

पाचोरा : तालुक्यातील जारगाव येथे नाथ मंदिर परिसरात आयोजित ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला माजी सरपंचाने मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. ग्रामसभेतील या कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय घडला?

ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना गावातील एका तरुणाने प्रशासकीय कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी माजी सरपंच तथा बाजार समिती संचालक सुनील पाटील यांनी चर्चेत हस्तक्षेप केला. त्यावर संबंधित तरुणाने, “मी तुम्हाला नाही, तर थेट प्रशासकाला जाब विचारत आहे,” असे स्पष्ट केले.

यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद वाढल्यानंतर सुनील पाटील यांनी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ग्रामसभेसारख्या सार्वजनिक व्यासपीठावर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

तरुणाची पोलिसांत तक्रार

घटनेनंतर संबंधित तरुणाने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत सुनील पाटील यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अदखलपात्र (N.C.) गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

माजी सरपंचांचा वेगळा दावा

दरम्यान, या प्रकरणाबाबत सुनील पाटील यांनी वेगळा दावा केला आहे. संबंधित तरुणाच्या घरातील सांडपाणी सातत्याने आपल्या प्लॉटमध्ये सोडले जात असल्याने आपल्याला त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर वैयक्तिक वाद असल्याचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

दरम्यान, ग्रामसभेत झालेल्या कथित मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ग्रामसभेत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना अशा प्रकारची घटना घडल्याच्या आरोपामुळे ग्रामस्थांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.