एरंडोलच्या गुन्हेगारी टोळीला पोलिसांचा दणका; गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तिघांवर जिल्हाबंदी

0

एरंडोल : एरंडोल शहर व परिसरात टोळी तयार करून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप असलेल्या गुन्हेगारी टोळीविरोधात जळगाव पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याची प्रवृत्ती असल्याच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह तिघांना तब्बल एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टोळीप्रमुखासह तिघांवर जिल्हाबंदी

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शुभम कैलास महाजन (१८, रा. नागोबा मढी, एरंडोल), पवन प्रकाश मराठे (१९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) आणि शुभम उर्फ ‘झिंग्या’ दत्तात्रय पाटील (२५, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये कारवाई

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून संबंधित तिघांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावासोबत संबंधितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आणि दाखल गुन्ह्यांचा तपशील सादर करण्यात आला.

या प्रस्तावाची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये तिघांना एक वर्षासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

पोलिसांच्या या कारवाईमुळे एरंडोल शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यास मदत होणार असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.