जळगाव रेल्वे स्थानकावर मोठे काम; २३-२४ सप्टेंबरला १२ गाड्या रद्द
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकावर ५व्या रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. २३ आणि २४ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल १२ रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

५व्या रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचे काम


जळगाव ते भुसावळ दरम्यान ५व्या रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा नवीन मार्ग मुख्य रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटीचे तांत्रिक काम करण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत काही गाड्यांच्या फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या ब्लॉकमुळे २३ आणि २४ सप्टेंबर रोजी स्थानिक तसेच काही महत्त्वाच्या रेल्वेसेवा प्रभावित होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबरला ‘या’ गाड्या रद्द
२३ सप्टेंबर रोजी पुढील पाच गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत :
सुरत-भुसावळ एक्सप्रेस (१९००७)
उधना-भुसावळ मेमू (१९१०५)
भुसावळ-उधना मेमू (१९१०६)
भुसावळ-देवळाली मेमू (११११४)
बडनेरा-नाशिक रोड मेमू (६११३०)
२४ सप्टेंबरला सात गाड्या रद्द
२४ सप्टेंबर रोजी एकूण सात गाड्यांच्या फेऱ्या रद्द राहणार आहेत :
भुसावळ-सुरत एक्सप्रेस (१९००८)
नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर (५९०७५)
भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (५९०७६)
इगतपुरी-भुसावळ मेमू (११११९)
भुसावळ-इगतपुरी मेमू (१११२०)
देवळाली-भुसावळ मेमू (११११३)
नाशिक रोड-बडनेरा मेमू (६११२९)
प्रवाशांना आधीच नियोजन करण्याचे आवाहन
या गाड्यांवर दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी तसेच स्थानिक प्रवाशांना रद्दीकरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित रेल्वेसेवेची उपलब्धता आणि वेळापत्रक तपासून घ्यावे. ५व्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार असली, तरी सध्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे प्रवाशांना तात्पुरता त्रास सहन करावा लागणार आहे.