लोकसंवादाची वारी… श्री शिवनेरी चौक महिला मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याची प्रेरणादायी कहाणी

0

महिला मंडळाच्या गणेशोत्सव उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श

जळगाव | ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-२०२६’ या उपक्रमांतर्गत रायसोनी नगर परिसरातील श्री शिवनेरी चौक महिला मित्र मंडळाने बसविलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेत महिला मंडळाच्या सदस्यांशी तसेच गणेशभक्तांशी आपुलकीचा संवाद साधण्यात आला.

श्री शिवनेरी चौक महिला मित्र मंडळ गेल्या पाच वर्षांपासून महिलांच्या पुढाकारातून सामाजिक कार्य करीत आहे. कोणाकडूनही वर्गणी न घेता महिलांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गरीब व गरजू महिलांना मदत करणे, त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, तसेच महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, अशा स्वरूपाचे कार्य मंडळाच्या माध्यमातून केले जाते.
महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला असून, परस्पर सहकार्य आणि एकजुटीच्या भावनेतून मंडळाचे कार्य सुरू आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याचे माध्यम ठरावा, यासाठी मंडळाच्या महिला विविध उपक्रमांत सहभागी होत आहेत.
‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनातर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
गणेशभक्तांशी संवाद साधताना मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेण्यात आली. महिलांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन समाजातील गरजू घटकांसाठी काम करण्याचा दिलेला संदेश या लोकसंवादातून अधोरेखित झाला.
मंडळाच्या या कार्यात दिपाली गवळी, वर्षा निकम, ममता दिघडे, प्रियंका सैंदाणे, हर्षा काळे, मनिषा पाटील, कविता पाटील, कंचन पाटील, सुनिता पाटील आणि सविता चौधरी यांचा सक्रिय सहभाग आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.