नाशिक, धुळे, जळगावमध्ये वादळी पावसाचा अंदाज
नाशिक : मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांतही काही दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या घाट परिसरासाठी या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा मात्र दिलेल्या ‘यलो अलर्ट’च्या यादीत समावेश नाही.

उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली होती. पावसाअभावी शेतकरी चिंतेत सापडला. या परिस्थितीत पावसाच्या पुनरागमनाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासह परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या घाट परिसरात पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.


१२ सप्टेंबरला नाशिक, धुळे, जळगावमध्ये शक्यता
१२ सप्टेंबर रोजी नाशिक घाटासह नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक विभागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१३ सप्टेंबर रोजी नाशिकसह कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट परिसरासाठी पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरीचाही त्यात समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात ११ सप्टेंबरला घाट परिसरात ‘यलो अलर्ट’ असून, १२ आणि १३ सप्टेंबरला जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. १४ सप्टेंबरला पुन्हा नाशिक घाट परिसराला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यांत १२ सप्टेंबरला वादळी पाऊस आणि विजांची शक्यता असून, जळगावमध्ये १३ सप्टेंबरलाही पावसाचा अंदाज आहे. नंदुरबारचा मात्र या कालावधीतील ‘यलो अलर्ट’च्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही.