भुसावळात धक्कादायक घटना: किरकोळ वादातून रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने वार करून हत्या
भुसावळ:

येथील पाटीलमळा परिसरात गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूचे सपासप वार करून हत्या करण्यात आली. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. समता नगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोळा सणाचा उत्साह आणि शांततेचे वातावरण असतानाच या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.


नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री तुषार सोनवणे हा तरुण आपल्या परिचिताची दुचाकी (एम.एच. १९ सी.एच. १४०५) घेऊन पाटीलमळा भागातून जात होता. यावेळी त्याचा एका अल्पवयीन मुलाशी कुठल्यातरी कारणावरून अचानक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संशयित अल्पवयीनाने तुषारच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर चाकूने भीषण वार केले. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने तुषारचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला.
‘डायल ११२’ मुळे आरोपी तातडीने जाळ्यात
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांच्या ‘डायल ११२’ क्रमांकावर संपर्क साधला. माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथकही शहरात गस्तीवर होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पळून जाणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याला काही वेळातच ताब्यात घेतले.
पोलीस उपअधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
शांततेत पार पडलेल्या पोळा सणानंतर शहरात झालेल्या या खुनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.