शेठ एन. के. टी. महाविद्यालयात रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिर

0

ठाणे | ठाणे येथील शेठ एन. के. टी. महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास सोसायटीचे मानद मंत्री श्री. नटवरलाल वीरजीभाई ठक्कर, प्राध्यापिका डॉ. हिमांशी मनसुखानी, वैभव गलादेकर, रोनक पंचाल, अनघा राजवाडे, वेदांत धोंने, डॉ. दिपाली मुलमुले आणि श्री. जितेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. दिलीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “रक्तदान हे महादान आहे. आपल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यात आपण सहभागी होऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण गांभीर्याने घेऊन समाजासाठीही आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. “रक्त घेण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळतात; मात्र रक्तदान करण्यासाठीही अशीच पहिली रांग असली पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.सोसायटीचे मानद मंत्री श्री. नटवरलाल वीरजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, रक्ताची निर्मिती प्रयोगशाळेत करता येत नाही. त्यामुळे एका व्यक्तीने केलेले रक्तदान दुसऱ्या गरजू व्यक्तीला नवजीवन देऊ शकते. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांचा वाढदिवस २३ सप्टेंबर २०२६ रोजी आहे. मात्र, महाविद्यालये व शाळांमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे दोन आठवडे आधीपासून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि २३ सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम घेतले जातात. रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या संख्येने रक्तदानासाठी रांगा लावल्या. विद्यार्थ्यांचा हा उत्साह श्री. नानजीभाई ठक्कर यांच्याप्रती असलेला स्नेह व आदर व्यक्त करणारा ठरला.
या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर, तर लायन्स क्लब ऑफ ठाणे यांच्या डॉक्टर व स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रचिकित्सा शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १०१ रक्ताच्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सामाजिक बांधिलकीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला

Leave A Reply

Your email address will not be published.