रांची : परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात झारखंडमध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विद्यार्थ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून विधानभवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी पाण्याचा मारा आणि त्यानंतर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे १५०० सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आंदोलनावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेण्यात आली.


बॅरिकेड्स हटवून विद्यार्थ्यांचा विधानभवनाकडे मोर्चा
विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा केला. तरीही आंदोलक मागे हटले नाहीत आणि दुसऱ्या मार्गाने विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रांचीमध्ये दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सरकारचा दावा विद्यार्थ्यांनी फेटाळला
दरम्यान, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे. मात्र, विद्यार्थी आंदोलकांनी सरकारचा हा दावा फेटाळून लावला असून, त्यांच्या मागण्यांवर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थी तयार नसल्याचे दिसून येत आहे.
झारखंडमध्ये देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. परीक्षा घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे.
विधानभवन परिसरात निर्बंध
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विधानभवनाच्या ७५० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, लाठीचार्जदरम्यान पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप काही विद्यार्थी आंदोलकांनी केला आहे. एका आंदोलकाने पोलिसांनी डोके, हात, चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर लाठीने मारहाण केल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे आता विद्यार्थी आंदोलनातील पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.