पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

0

जळगाव | राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घेतलेल्या कृषी पीक कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसीसह आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात केले.

या योजनेनुसार दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

जिल्ह्यात सुमारे ८७ हजार ८२६ कर्जखाती पात्र असून त्यापैकी ६५ हजार ३४३ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५३ हजार ८९६ तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या ११ हजार ४४७ कर्जखात्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ३६ हजार ५०४ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून २८ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. प्रसिद्ध झालेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी, सेतू सुविधा केंद्र किंवा आधार केंद्रावर जाऊन कर्जखात्याची माहिती पडताळून ई-केवायसी पूर्ण करावी.

लाभ मिळण्यासाठी कर्जखाते आधार प्रमाणित असणे तसेच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ही प्रक्रिया अद्याप पूर्ण नसेल, तरी ती तातडीने करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कर्जखात्यातील माहितीबाबत तक्रार, मयत शेतकऱ्यांच्या वारसांची प्रकरणे किंवा जमीन विक्रीनंतर उद्भवलेल्या अडचणींचे निराकरण तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समित्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या महसूल अधिकारी, तलाठी, तहसील कार्यालय किंवा संबंधित बँकेशी संपर्क साधून कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.