जळगाव पोलिसांनी जप्त केलेला ९५८ किलो गांजा केला नष्ट
जळगाव : अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे. जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल ९५८.०७० किलो गांजाची न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांमधून हा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांमधून ४३२.२४० किलो, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमधून २६२.४३० किलो, एरंडोल पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून १८२ किलो, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून ५८ किलो आणि जामनेर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून २२ किलो असा एकूण ९५८.०७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.


संबंधित गुन्ह्यांपैकी काही प्रकरणांचा न्यायालयीन निकाल लागला असून काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. मात्र, न्यायालयाची परवानगी आणि सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या अमली पदार्थांचा नाश करण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कठोर भूमिका घेतली असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे, अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या या धडक मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.