पशुसंवर्धन विभागाच्या तत्परतेने टळली मोठी जीवितहानी; १९६२ हेल्पलाइन ठरली ३५ पशुधनासाठी नवसंजीवनी!
जळगाव । बाजारात विक्रीस आलेल्या अप्रमाणित खाद्याचा पुरवठा केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गालापुर येथील एका पशुपालकाच्या ३५ गाई-म्हशींना अचानक फूड पॉयझनिंग (अन्नबाधा) झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. मात्र, शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ‘१९६२’ या आपत्कालीन हेल्पलाइनच्या तत्परतेमुळे या सर्व पशुधनाचे प्राण वाचवण्यात यश आले असून एक मोठी संभाव्य जीवितहानी टळली आहे.
गालापुर येथील पशुपालक हमीर गबाजी गवळी यांच्या ३५ गाई-म्हशींना अनोंदणीकृत खाद्यामुळे विषबाधा झाली होती. काही पशुधनाची प्रकृती अत्यंत गंभीर बनल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा कठीण परिस्थितीत श्री. गवळी यांनी भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जाणाऱ्या १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथील राज्यस्तरीय कॉल सेंटरच्या टीमने माहिती मिळताच तात्काळ क्षेत्रीय स्तरावरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आणि या घटनेची माहिती डॉ. यशवंत धावसे यांना दिली.

अवघ्या दीड तासात वैद्यकीय पथक घटनास्थळी
माहिती मिळताच डॉ. यशवंत धावसे यांनी कमालीची तत्परता दाखवली. आपले सहकारी पशुधन पर्यवेक्षक सुदर्शन पाटील व वाहनचालक भूषण कोळी यांच्यासह त्यांनी अवघ्या दीड तासात दुर्गम भागातील घटनास्थळ गाठले. पथकाने आजारी पशुधनाची तात्काळ तपासणी करून युद्धपातळीवर उपचार सुरू केले. योग्य निदान आणि वेळेत मिळालेल्या औषधोपचारामुळे सर्व ३५ गाई-म्हशींवर यशस्वी उपचार करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत सहाय्यक आयुक्त डॉ. योगेश महाले आणि डॉ. पी. आर. पारखी यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.


१९६२ कॉल सेंटरवरुन संदेश मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी उपचारार्थ भेट दिली. पशुधनाने अप्रमाणित पशुखाद्य खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे समोर आले. त्यानुसार बाधित पशुधनावर सोडियम बायकार्बोनेट, चारकोल, अट्रॉपीन सल्फेट, आर.एल., सी.पी.एम. व बी-कॉम्प्लेक्स औषधींद्वारे उपचार करण्यात आला. सलग चार दिवस उपचार केल्यानंतर बाधित पशुधन आता सुरक्षित आहे.
डॉ. यशवंत धावसे, फिरते पशुवैद्यकीय पथक (१९६२), एरंडोल, जि. जळगाव
१९६२ ही पशुवैद्यकीय आपत्कालीन सेवा राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पशुधनाच्या आरोग्याचे संरक्षण व पशुपालकांना वेळेवर उपचार सेवा उपलब्ध करून देणे ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राज्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १९६२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभाग त्यांच्यापर्यंत जलद, गुणवत्तापूर्ण व प्रभावी पशुवैद्यकीय सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध आहे.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.)
आयुक्त पशुसंवर्धन, पुणे