जळगाव जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी
जळगाव । मार्च संपताच राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले आहे. एकीकडे कडक ऊन आणि वाढते तापमान नागरिकांना हैराण करत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीचे सावट राज्यभर पसरले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात वातावरण ढवळून निघणार आहे. यामुळे बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 50 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर जळगावसह नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी यांसह अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विशेषतः आज आणि उद्या गारपीटीचा धोका अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंबा पिकावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. गारपीट आणि पावसामुळे आंब्याचा मोहोर गळण्याची शक्यता असून उत्पादन घटण्याची भीती आहे. आधीच मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असताना पुन्हा येणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
दरम्यान, नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उकाडा आणि अचानक होणारा पाऊस यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.