खेडभैरवला तरुणाचा खून करणाऱ्या अज्ञात ९ आरोपींना केलं जेरबंद

0

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथील समाधान आगविले या तरुणाचा खुन करणाऱ्या ९ अज्ञात आरोपींना ४८ तासात जेरबंद करण्यास घोटी पोलीसांना मोठे यश आले आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरलेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या सर्व संशयित आरोपींना ४८ तासात जेरबंद केले आहे. सदरची घटना ही पुर्ववैमनाश्यातुन घडली असून घटनेच्या दिवशी या सर्व आरोपींनी पार्टी करून समाधान आगविले यास कोणाच्या तरी मार्फत घटनास्थळी बोलावुन घेतले होते. समाधान आगविले यास या सर्वांनी मिळुन घातक शस्त्राने डोक्यावर अनेक वार करून खून केला. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ज्ञानदेव सप्रे व मयत समाधान आगविले यांचे शाळेत शिकत असल्यापासुन वैर होते अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक आदित्य मिरलेकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २२ रोजी इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास समाधान आगविले, वय २१ वर्ष या तरुणाचा खुन करण्यात आला होता. याबाबत मयताच्या वडिलांनी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरू विरुद्ध तक्रार दाखल केली होती. आरोपींनी कुठलाही पुरावा सोडला नसल्याने आरोपींना अटक करण्याचे पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या घटनेचा समांतर तपास करून गुप्त माहितीच्या आधारे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत ४८ तासात या घटनेत ९ आरोपींना जेरबंद केले.

सदरच्या घटनेत ज्ञानेश्वर नामदेव सप्रे, हेमंत भास्कर सप्रे, रा. शिरसाठे, इगतपुरी, विकास भगवान शिंदे, शंकर सोमनाथ पाडेकर, प्रविण गौतम धोंगडे, सर्व रा. वाळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर, संदीप काशिनाथ गोहिरे, सोमनाथ काशिनाथ गीरे, रा. रायगडनगर, नाशिक, रविंद्र त्र्यंबक आहेर, रा. शिरसाठे, इगतपुरी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मारुती इको M H 17 BV 5524 ही कार देखील पोलीसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रविण उदे, अजय कौटे, पोलीस हवालदार सतीश शेलार, गुरुदेव मोरे, प्रसाद दराडे, संतोष नागरे, योगेश यंदे, सतीश चव्हाण, केशव बस्ते, गौरव सोनवणे, निलेश साळवे, मारुती बोऱ्हाडे आदी पोलीस पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.