सांस्कृतिक खात्यातील “सांस्कृतिक ठेकेदारां”चा बाजार कधी बंद होणार…!
बऱ्याच वर्षानंतर राज्याला अनुभवी आणि एक अभ्यासू सांस्कृतिक कार्य मंत्री लाभले.मुंबईतील गिरणगावच्या संस्कृती पासून ज्यांचा सुरु झालेला जीवनप्रवास सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या कोकणांच्या मातीशी जोडला गेला.,असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी डिसेंबर 2024 साली सांस्कृतिक कार्य विभागाचा पदभार स्वीकारला. अन या विभागाला गती मिळाली. नुकताच राज्यात बाराशे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी सोडला.ही कौतुकास्पद आहे. यामुळे या विभागाला एक नवीन झळाळी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळख पुन्हा एकदा नव्या जोमाने विश्वपातळीवर आणि राष्ट्रपातळीवर करून देण्याची ताकद त्यांच्यात आहे हे स्पष्ट झाले. त्यांच्यामुळे आता जागतिक पातळीवर आपल्या लोक संस्कृतीचा आणखीन विस्तार होईल.याबद्दल दुमत नाही.
सांस्कृतिक वैभव असलेल्या या महाराष्ट्राला अनेक मातब्बर सांस्कृतिक कार्य मंत्री यापूर्वी लाभले. त्यापैकी माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख,स्व.प्रमोद नवलकर, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी दिलेले योगदान कधी विसरू न शकणारे आहे.त्यांची या विभागातील कार्य पद्धती अजरामर राहील,येवढे चांगलं कार्य या मंडळींनी सांस्कृतिक कार्य विभागात केले आहे. त्यांनी या विभागाला नाव लौकिक मिळवून दिले. आज तीच धुरा… तीच योग्य जबाबदारी… ऍड.आशिष शेलार यांच्याकडे आली आहे.
स्वतः हा बी.एस्सी आणि एलएलबी पदवीधर असलेले शेलार यांना जेवढे कायद्याचे ज्ञान आहे.तेवढे त्यांचे सांस्कृतिक चळवळीत पूर्वी पासून मोठे योगदान आहे. परंतु कदाचित ते कोणाच्या येवढे दिसण्यात आले नसावे. त्यांची स्वतःहाची “स्पंदन आर्ट” नावाची एक संस्था गेली वीस वर्षापासून सांस्कृतिक क्षेत्रात मुंबईत काम करते.ती संस्था गेली अठरा वर्षापासून महंमद रफीक यांच्या स्मरणार्थ दोन कलावंतांना पुरस्कार देवून सन्मानित करीत असतात..येवढेच नव्हे तर दर दिवाळीला “दिवाळी पहाट” हा सुगम संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम ते आयोजित करतात. त्यांनी अनेक चित्रपट आणि लघुपटांची निर्मिती केली आहे.याची शक्यतो अनेकांना माहिती ही नसावी. 26 जुलै 2005 सालच्या मुंबईतील भीषण महापूरावर आधारित चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.गिरणी कामगारांच्या जीवनपटावर आधारित “डेट चिमणी” गोळवळकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा लघुपट, स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जीवनकार्याचा आढावा घेणारा लघुपटांची निर्मिती केली. “चांगभलं आणि काळीज” सारख्या चित्रपटाची निर्मिती… हेच सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचं भरीव योगदान सर्व काही सांगून जाते. कोकणाच्या लोक संस्कृती बद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा. गिरणगावातील भजनं आणि कोकणातील दशावतार,नाटकं त्यांनी जत्रा – उत्सवात जवळून पाहिली आहेत. ज्याप्रमाणे क्रिकेट विश्वात त्यांचा मोठा जसा दबदबा आहे, तसाच चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांचा पूर्वी पासून मोठा दबदबा असल्याने त्यांच्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र नवीन नाही. 2019 साली ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाल्यावर त्यांच्याकडे अगदी थोड्या कालावधीसाठी शालेय शिक्षण खातं आले.त्या संधीचा फायदा घेवून त्यांनी शिक्षण खात्यातील झारीतील शुक्राचार्य वठणीवर आणले होते.त्यामुळे त्यांचा प्रशासनावर चांगला वचक असतो. यांना कामाचा अनुभव आहे.संघटनात्मक कौशल्य त्यांच्याकडे आहे.
सांगायचं तात्पर्य येवढच आहे की, पाठीशी दांडगा अनुभव असलेले सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्राला बऱ्याच वर्षानंतर लाभलेला आहे.त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील आलेली आव्हाने आणि जबाबदाऱ्या त्यांना या निमित्ताने स्वीकाराव्या लागणार आहे.
एखादा विषयाचा तळमळीने मार्ग काढणे, त्यांचा बारकाईने अभ्यास करणे, ही ऍड.आशिष शेलार यांची खासियत असल्याचे अनेकांकडून सांगितले जाते. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाकडे लक्ष देतांना, गेले अनेक वर्षांपासून काही “सुप्तशक्ती” तथाकथित.”सांस्कृतिक ठेकेदार” म्हणून सांस्कृतिक कार्य विभागात सक्रीय काम करीत आहेत.हे कोण आहेत.याचा शोध त्यांना घ्यावा लागणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी दरवर्षी करोडो रुपये खर्च करून विविध औचित्य साधून मोठ- मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. मग दरवर्षी प्रमाणे काही “सांस्कृतिक मक्तेदारी ” निर्माण करणारे आपल्याला कार्यक्रम मिळविण्यासाठी अनेक पद्धतीने दबाव तंत्र वापरतात.. जर हा कार्यक्रम आम्हाला देत नसतील तर सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या बगलबच्चेना मिळण्यासाठी रात्र दिवस यांची धडपडत सुरु करीत असतात. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्रास देत असतात. त्यांच्यावर मंत्रालयातून राजकीय प्रेशर आणतात. त्यामुळे त्याच – त्याच लोकांना दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाची खिरापती वाटली जाते.
अशा सांस्कृतिक ठेकेदाराकडून सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची सुटका वेळीच करणे गरजेचे आहे . या कृतीमुळे गावपातळीवर काम कारणाऱ्या असंख्य प्रतिभावंत लोककलावंतांची संधी हिरावली जाते..
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी म्हणजे हे एक वेगळे संस्थांनच आहे.या अकादमीत अभिजात कलेसाठी सतत दरवाजे उघडे आहे. असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. मात्र पु ल. कला अकादमीची टोलजंग वास्तू पाहताच, आमच्या अनेक लोक कलावंतांच्या कधी कधी छातीत कळा येतात. अशी ही देखणी वास्तू आहे. येथे अभिजात कलांचा डंका वाजतो.येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे,शाहीर अमरशेख,आत्माराम पाटील, गव्हाणकर.यांचा डफ वाजणार नाही. आमच्या लोक कलाकारांची दुर्मिळ झालेल्या तुणतुण्यांची तार येथे छेडली जाणार नाही.हलगी वाजत नाही.त्यामुळे येथे सदैव लोककला उपेक्षितच राहिली आहे.
तर सांस्कृतिक कार्य संचालनालय हे गोरगरीब लोककलावंतांची एक पंढरी आहे.येथे शाहिरी, तमाशा,लावणी,भारूड,कीर्तन,दशावतारा पासून अगदी विदर्भातील खडी गंमत,दंडार असे विविध कार्यक्रमापर्यत संचालनालयाने सामावून घेतले आहे. जेष्ठ वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनापासून ते पुरस्कारापर्यत येथे सर्व प्रश्न मार्गी लागतात.मात्र येथे ही सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांना काही “बडव्यां”नी घेरले आहे.अनेक वेळा त्यांना चुकीच्या लोकांचे ऐकून चुकीचे निर्णय घ्यावे लागतात.कदाचित त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाब ही असू शकते.ही बाब नाकारता येते नाही.सतत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाच्या ओझ्याखाली संचालक दबलेले असल्याने सध्या संचालक महाराष्ट्राच्या लोक कलाकारांसाठी विन्मुख झाले आहेत.त्यामुळे त्यांचा अनेक वेळा संवाद भोळ्याभाबडया लोककलावंतांशी ऑनलाईन सुरु असतो.
महाराष्ट्राला सांस्कृतिक कलेचा उच्च ठेवा लाभलेला आहे. हा वारसा आपण सर्व जतन करीत आलेलो आहे.सध्या पश्चातीकरण,उदारीकरण आणि वाढत्या मनोरंजन माध्यमांच्या आक्रमणामुळे आपल्या बदलत्या काळात आपली परंपरा..आपली संस्कृती.. लोप पावत चालेली आहे.या लोप पावत चाललेल्या कला संस्कृतीला पुन्हा एकदा राजश्रय व लोकाश्रय देण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार करीत आहेत. त्याबद्दल प्रश्नच नाही. राज्यात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.हे कार्यक्रम आयोजित करत असताना सर्व भागातील कलावंतांना समान संधी देण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या आहे.याबाबत त्यांची प्रमाणिक तळमळ नक्कीच दिसून येते.मात्र याची योग्य अंमलबजावणी अधिकारी करतील काय..! याबद्दल शंका आहे. कारण दि.22 डिसेंबर 2023च्या “शासन निर्णया”नुसार सांस्कृतिक कार्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात “महासंस्कृती महोत्सव” आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पाच-पाच कोटीं रुपयाचा भरघोस निधी वाटप केला.जिल्ह्या जिल्ह्यात कार्यक्रम सुरू झाले.मात्र ज्या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करायचे होते.तो उद्देश त्यावेळी मात्र असफल झाला होता.केवळ शासनाचे करोडो रुपयांची उधळपट्टी या काळात झाली.स्थानिक लोककलावंतांना संपूर्णपणे लाचारासारखी वागणूक आयोजकांनी दिली.
अनेक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्य संचालनालयात घुटमाळणाऱ्या सांस्कृतिक ठेकेदारांनाच मिळतो असे अनेक वेळा आक्षेप घेतले गेले..अनेक लोककलाकारांनी या दरम्यान शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. अशी वेळ पुन्हा येवू नये, यावर मात्र सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना जातीने लक्ष घालावे लागणार आहे.
खरं तर सांस्कृतिक अभ्यास हा एक संवादात्मक व मुक्तदायी व्यवहार आहे. जो वेगवेगळ्या माणसांना जोडला जातो. पण गेले काही वर्षांपासून पावसाळी छत्र्या सारखे “सांस्कृतिक उपदेशक”निर्माण झाले आहेत.उथळ पाण्याला खळखळाट फार या उक्तीप्रमाणे चुकीची मांडणी करून कोणताही आधार किंवा प्रमाण न देता लोककलेच्या नावाखाली लोकांचा भ्रम निर्माण करतात. आज हे सांस्कृतिक उपदेशक “सांस्कृतिक सभ्यता” पाळत नाहीत.त्यांचा संवेदनशीलतेचा अभाव, स्वार्थी हेतू,अशा या अपूर्ण ज्ञान आणि संशोधन हे सांस्कृतिक क्षेत्राला मारक आहे.याचे भान या मंडळींना अद्याप आलेले नाही.
त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या आपण कोणाला समावून घेतले पाहिजे. कोणाचा सहभाग घेतला पाहिजे, कोणाला वगळले पाहिजे. कोणाची मक्तेदारी स्वीकारली पाहिजे,कोणाचा किती आणि केव्हा पर्यत स्वार्थ जपला पाहिजे. याविषयीचे चिकित्सक भान सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य.संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना असले पाहिजे.नाही तर अशा मंडळीमुळे सांस्कृतिक खात्याची बदनामी आणि लोकसंस्कृतीचा ऱ्हास व्हायला उशीर लागणार नाही.उलट आपल्या संस्कृती परिवर्तन घडविण्यासाठी पायाभूत संसाधन कसे महत्वाचे ठरेल.याकडे अधिक लक्ष सांस्कृतिक कार्य खात्याने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिले पाहिजे.
आज सांस्कृतिक कार्य खात्याला गेली तीन वर्षांपासून पूर्ण वेळ सांस्कृतिक कार्य सचिव मिळेना. याचे कारण अजून समजू शकत नाही. पण सांस्कृतिक चळवळीत कार्य करणाऱ्यासाठी ही एक मोठी शोकांतिका आहे.कारण या खात्याकडे दुय्यम खातं या दृष्टीने बघतीले जाते.
परंतु या खात्याकडे आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने पाहिले तर येथे कला- ज्ञान-,श्रद्धा,- भाव – भावना – परंपरा – नितीतत्व- संस्कार याची मूल्ये अमूर्त आहेत. हे खातं सृजनशीलतेचा आत्मा आहे. हे कळायला काहींना उशिर लागेल.कारण या खात्यात तन मन भावना लोकसेवाचा गाभा आहे. आपल्या पुढच्या पिढीला सांस्कृतिक वैभव समजले पाहिजे.असे व्यापक दृष्टीने काम येथे करावे लागते.
राज्याच्या सांस्कृतिक भूमीला ऍड आशिष शेलार यांच्या सारखे तळमळीचे मंत्री लाभलेले आहे.त्यामुळे हे खातं प्रस्थापितांच्या मक्तेदारीपासून मुक्त करा.अन्यथा लोक संस्कृतीच्या परंपरेला आणि मूळ गाभ्याला कुठे तरी गळती लागण्याची शक्यता आहे.
खंडूराज शं.गायकवाड
संपर्क- 9819059335
मेल -khandurajgkwd@gmail.com
(लेखक जेष्ठ राजकीय पत्रकार असून लोककला क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.)