विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातून सौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, : राज्यात विजेचे स्मार्ट पोस्टपेड मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २७,८२६ फिडर मीटर आणि ३८ लाख ग्राहक मीटर लावण्यात आले आहेत. या ग्राहकांना सौर तासांमधील विजेच्या वापरावर बिलामध्ये १० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यात पहिल्यांदाच विजेचे दर कमी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील जवळपास सर्वच राज्ये स्मार्ट पोस्टपेड मीटर लावत असून या योजनेसाठी केंद्र सरकारमार्फत महाराष्ट्राला २९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. स्मार्ट मीटर लावण्यासाठी निविदा काढण्यात आली होती, त्यातून चार विविध कंपन्यांना काम देण्यात आले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यातील विजेचे दर कमी आहेत. स्मार्ट पोस्टपेड मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली नसून या मीटरमध्ये प्रत्येक युनिटचे कॅलक्युलेशन ऑटोमॅटिक होत असल्याने वीज देयकामध्ये वाढ होण्याची शंका निर्माण होण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोळीवाडे आणि वन जमिनीवरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन योजना तयार करण्यात येईल आणि ती न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.