चिपळूणमधील गाळ उपाशाची सर्व मेहनत ‘पाण्यात’ चुकीच्या बांधकाम परवानग्यांमुळे शहराचे वाटोळे
लवकरच काँग्रेस छेडणार जनआंदोलन – तालुकाध्यक्ष लियाकत शाह
चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूणमध्ये नद्यांमधील गाळ काढण्यासाठी सुमारे अद्यापपर्यंत १० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. पण त्याचा उपयोग शून्य आहे. अवघ्या काही तासांच्या पावसातच शहरातील काही भागात पाणी साचत आहे. शहरातील नैसर्गिक जलस्तोत्रांवर झालेले आक्रमण, पालिकेने दिलेल्या चुकीच्या बांधकाम परवानग्या यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याविरोधात काँग्रेस आंदोलन छेडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी सोमवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
गेले दोन दिवस चिपळुणात मुसळधार पाऊस सुरू असून रविवारी सायंकाळी शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अवघ्या काही तासाच्या पावसाने ही परिस्थिती निर्माण झाल्याने श्री. शाह यांनी शहरात जागोजागी केलेल्या भरावाला आक्षेप घेतला आहे. त्याबाबत प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले यांना सोमवारी निवेदन सादर केले आहे. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, चिपळूण शहराची रचना बशीच्या आकाराची आहे. त्यामुळे चिपळूण हद्दीतील गाळ काढल्यानंतर पाणी साचून राहते. त्यासाठी धामणदिवीपासून गाळ काढण्याची गरज आहे. परंतू तेथे गाळ न काढता बाजारपेठेत हद्दीतील गाळ काढून तो शहरहद्दीत टाकल्याने त्याचा उलटा परिणाम होऊ लागला आहे. अनेक इमारती व बंगले उभारण्यासाठी भराव स्वरूपात गाळाचा वापर केला गेला. यातून शहरातील जागोजागी असलेले पुर्वीचे तलाव व शेती बुजवून तेथे भराव आणि पत्र्याच्या शेड उभारल्या जात आहेत. शिवनदी किनाऱ्यावर जागोजागी पत्रा शेड उभारलेल्या दिसतात. याचपद्धतीने जुना कालभैरव मंदिरालगतच्या भागात पुर्वी शेती केली जायची. त्यामुळे या परिसरातील पाणी लगतच्या नाल्यातून वाशिष्ठी नदीला वाहून जात होते. मात्र आता तेच पाणी नव्याने केलेल्या भरावामुळे आईस फॅक्टरीच्या ठिकाणी अडून राहते. चिंचनाका येथेही केलेल्या भरावाचा फटका बसू लागला आहे. शहरातील अनेक ठिकाणी नव्याने भराव केले असून त्या-त्या भागातील लोकवस्तीला त्याचा फटका बसू लागला आहे.
मुळातच २००५ व २०२१ च्या महापुराची नोंद घेवून प्रशासनाने शहरातील पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी योग्य ते नियोजन व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने कठोर नियमावली ठरवायला हवी होती. परंतू त्याउलट शहरात प्रत्येक ठिकाणी उंच भराव करण्यास बेजबाबदारपणे परवानगी व नाहरकत दाखले देण्यात आले. त्यातून शहरातील नागरिकांना एकप्रकारे महापुराच्या खाईत लोटल्या सारखेच आहे. २००५ च्या महापुरानंतर शहरात नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती कामास ओपन पार्किंग शिवाय परवानगी न देण्याचा ठराव आमच्या कारकिर्दीत झाला आहे. त्या ठरावाची जराही अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रशासन त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असेल अथवा त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला जात असेल, तर ते जनतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारात सुधारणा न झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन चिपळूण तालुका कॉंग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, असाही शाह यांनी इशारा दिला. तसेच गाळ नियोजनबद्ध काढायला हवा. त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असून शासनानेही केवळ हवेत आकडे न सोडता गाळ उपसा व वाहून नेण्यासाठी पुरेसा निधी द्यावा, अशी मागणीही करणार असल्याचे श्री. शाह यांनी स्पष्ट केले.